पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने संपादन केलेल्या विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांपैकी तीन राज्यांत काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिमाखदार यश मिळवले. तर, या पाचही राज्यांत भाजपचा पराभव झाला. या सत्तांतरानंतर आरएसएसचे (RSS)माजी ज्येष्ठ प्रचारक मा. गो. वैद्य यांनी राहुल गांधींचे कौतुक केले आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले. अशी प्रतिक्रिया वैद्य यांनी दिली आहे.
दरम्यान, वैद्य यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसच्या विजयाबाबत बोलताना वैद्य म्हणाले, लोकशाहीप्रधान देशात कोणत्याही एका पक्षाचा प्रभाव हा लोकशाहीसाठी हातावह नसतो. त्यामुळे सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षही तितकाच प्रबळ असावा लागतो. त्यामुळे काँग्रेसच्या रुपात आता तो मिळत असल्याचे दिसते. दरम्यान, तीन राज्यांतील विजयानंतर राहुल गांधी यांच्या रुपात काँग्रेसला नेतृत्व करणारा नवा नेता मिळाला आहे. काँग्रेससाठी ही चांगली बाब आहे. दरम्यान, कोणत्याही पक्षासाठी दीर्घकाल सत्तेत राहणे कठीण असते. छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या निवडणूक निकालाने हे दाखवले असेही वैद्य म्हणाले. (हेही वाचा, BJP ची लाट का ओसरली? जाणून घ्या)
दरम्यान, या राज्यांमध्ये भाजपची झालेल्या पिछेहाट पाहता आपण काय प्रतिक्रिया द्याल? या प्रश्नावर बोलताना या प्रश्नावर मी काय सांगणार ती त्यांची अंतर्गत बाब आहे, असे वैद्य म्हणाले. वैद्य यांची एकूण प्रतिक्रिया पाहता नजिकच्या काळात भाजपमध्ये बदलाचे पडसाद उमटू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.