ठाणे: परिसरात सतर्कतेचा इशारा; अतिवृष्टीमुळे उद्या जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद, शासकीय सुट्टी जाहीर
मुंबई पाऊस (Photo Credits: ANI)

पावसाने परवापासून मुंबई (Mumbai) आणि परिसरात नुसता धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, घरांचे नुकसान होणे, लोक पुराच्या पाण्यातून वाहून जाणे असे अनेक अनुचित प्रकार घडले आहेत. या सर्वांचा विचार करता ठाणे (Thane) जिल्ह्यात उद्या शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी उद्या, (5 ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळा व कॉलेज बंद राहतील असे सांगितले आहे.

पावसामुळे शनिवारी मुंबईत वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे आणि पालघरमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून ठाणे शहराचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. या सर्वांचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. (हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा-कॉलेज उद्या बंद, पावसामुळे शासकीय सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश)

दरम्यान, नाशिक पाठोपाठ पुणे जिल्ह्यातही उद्या (5 ऑगस्ट) रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या ही सुट्टी असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांनी ही सुट्टी जाहीर केली आहे.