रणजितसिंह डिसले गुरुजी (PC - ANI)

Ranjit Singh Disale Scholarships: ग्लोबल टीचर पुरस्काराने (Global Teacher Award) सन्मानित रणजितसिंह डिसले गुरुजी (Ranjit Singh Disale) यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप (Scholarships) मिळणार आहे. इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना 400 युरोंची 'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यापीठस्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत. या विद्यार्थ्यांची निवड बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी करणार आहेत. विशेष म्हणजे पुढील 10 वर्षे 100 मुलांना 'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतील म्हणजेच सात कोटींपैकी साडे तीन कोटी रुपये 9 देशातील शिक्षकांना वाटून दिले होते. यात इटलीच्या कार्लो मझुने यांचादेखील समावेश होता. (वाचा - अभिमानास्पद! सोलापुरातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा 'Global Teacher Award' जाहीर)

दरम्यान, मागील वर्षी युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेचं भारतीय शिक्षक ठरले होते. जागतिक स्थरावर हा पुरस्कार मिळाल्यानंतर रणजितसिंह यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत होता.