कोल्हापूर: महापौर आणि उपमहापौर पद राखण्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश, सरिता मोरे महापौरपदी विराजमान
kolhapur mayor ( Photo Credit : Twitter)

Kolhapur Mayor and Deputy Mayor Elections : कोल्हापुर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीमध्ये अखेर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी बाजी मारली आहे. भाजप ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा पराभव करत कोल्हापूरच्या महापौरपदी कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरिता मोरे(Sarita More)  निवडून आल्या आहे.

अखेरच्या क्षणापर्यंत सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष प्रयत्न करत होते. विरोधी गटाचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील हा सामना प्रतिष्ठेचा बनला होता. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला गड राखण्यामध्ये यश मिळवले आहे.

कोल्हापुरच्या महापालिका महापौरपदी सरिता मोरे तर उपमहापौरपदी काँग्रेसचे भूपाल शेटे विराजमान झाले आहेत. महापौर आणि उपमहापौरपदी सत्ताधारी निवडून आल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

महापौरपदाच्या निवडीत सरिता मोरे यांना 41 तर जयश्री जाधव यांना 33 मते मिळाली. कोल्हापूरचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. जात पडताळणी पत्र वेळेत उपलब्ध करून न दिल्याने पाच उमेदवारांचा अपात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र अखेरीस कॉंग्रेस -राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत बाजी मारली.