Nitesh Rane: नितेश राणे यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार? सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात आज सुनावणी
Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना जामीन मिळणार की त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार यावर आज निर्णय होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात (Sindhudurg District Court) नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश होते. त्यांची न्यायालयीन कोठडी 18 फेब्रुवारी पर्यंत आहे. दरम्यान, त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज मंजूर होणार की फेटाळला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काल (6 फेब्रुवारी) सुनावणी होणार होती. मात्र, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्यामुळे न्यायालयीन कामकाजही बंद राहिले. परिणामी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी आज (मंगळवार, 8 फेब्रुवारी) पार पडणार आहे.

नितेश राणे यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची ओरोस येथी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. मात्र, ओरोस येथील रुग्णालयात हृदयविकार तज्ज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (CPR) दाखल करण्यात आले. येथे त्यांची हृदयरोग विभागात तपासणी करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. प्राप्त माहितीनुसार, नितेश राणे यांना कार्डिओलॉजिस्ट मेडिसीन विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Nitesh Rane Chest Pain: नितेश राणे यांना छातीच्या दुखण्याचा त्रास; रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला रवाना)

दरम्यान, नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने आगोदरच एक धक्का दिला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या संदेश तर्था गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. गोट्या सावंत हे नितेश राणे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी महाविकासआघाडीचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. हा हल्ला 18 डिसेंबर रोजी झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर हल्ल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या प्रकरणात हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलीसांनी दिल्ली येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नितेश राणे यांचे नाव घेतले. त्यानंतर कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, दाखल गुन्ह्यात अटक होणार अशी शक्यता असल्याने नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात याचिका दाखल केली. मात्र, सिंधुदुर्ग सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा तिन्ही कोर्टात त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता ते सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाला शरण गेले आहेत.