santosh deshmukh (img: tw)

Santosh Deshmukh Murder Case: बीड (Beed) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येविरोधात पुण्यात (Pune) 5 जानेवारीला तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. बीड आणि परभणी येथील आंदोलनांनंतर आता पुण्यात 5 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. याआधीच्या आंदोलनात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बंजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील इतर आमदार आणि राजकीय नेते सहभागी झाले होते.

मागील आंदोलनात सहभागी झालेल्या पोपळे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांनतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

संतोष देशमुख यांची कन्या वैभवीही होणार सहभागी-

बीडमध्ये हत्या झालेल्या संतोष देशमुख आणि पोलीस कोठडीत मरण पावलेल्या परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांनी पुण्यात 5 जानेवारीच्या मोर्चाचे आयोजन केले आहे. दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवीही पुण्यातील मोर्चात सहभागी होणार आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत तिने पुणेकरांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कुठे होणार आंदोलन?

पुण्यातील लाल महाल येथून हे आंदोलन सुरू होईल आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल. राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि स्थानिक समुदायांसह मोर्चेकर्ते आरोपींना तात्काळ अटक करून, त्यांना कायद्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून छळ करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकाराणार चार जणांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: Santosh Deshmukh Murder Case: 'या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा?'; Minister Dhananjay Munde यांचा सवाल)

कन्या वैभवीचे लोकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन-

विरोधी पक्षनेत्यांनी हिवाळी अधिवेशनात या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा राज्य विधिमंडळात केला होता. हत्येचा नसून खंडणीच्या संबंधित प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेला कराड नुकताच पुण्यात शरण आला. दरम्यान, विरोधकांच्या राजीनामाच्या मागण्या आणि आरोपांना प्रत्युत्तर देताना मुंडे यांनी गुरुवारी या प्रकरणातील आपला सहभाग ठामपणे नाकारला आणि आपण या प्रकरणात सहभागी नसताना राजीनामा का द्यायचा असा सवाल केला. ते म्हणाले, मी राजीनामा देण्याचे कारण काय आहे?. मी यापैकी कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही किंवा माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मग माझा राजीनामा का मागितला जात आहे.