File Photo Of Sant Dyaneshwar Palkhi (Photo Credits: Wiki Commons)

महाराष्ट्रामध्ये यंदा कोरोना संकट आटोक्यात आल्याचं चित्र असल्याने वारी पुन्हा 2 वर्षांनी नियममुक्त वातावरणात पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे. काही पालख्यांचे मार्गक्रमण सुरू देखील झाले आहे पण वारीतील प्रमुख आकर्षण असणार्‍या संत तुकाराम आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी 20,21 जूनला निघणार आहे. त्यांच्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान संत तुकाराम यांच्या पालखीच्या मुक्काम ठिकाणांपैकी इंदापूर (Indapur) मधील मुक्काम ठिकाण आता बदलण्यात आलं आहे. नारायणदास हायस्कूल ऐवजी आता तुकोबा रायांची पालखी इंदापूरात आयटीआय कॉलेज मध्ये मुक्कामाला असणार आहे.  पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी याचे संकेत दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जून दिवशी देहू मधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. सध्या नव्या ठिकाणासाठी संबंधितांशी बोलणी सुरू आहे आणि जो निर्णय होईल त्याप्रमाणे प्रशासन पुढील तयारी करणार असल्याचं सांगण्यात आले आहे. यंदा पालखी मध्ये महिलांचा समावेश  पाहता त्यांच्यासाठी विशेष सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: Ashadhi Wari Sant Tukaram Palkhi 2022: संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा गोल रिंगण, उभं रिंगणाच्या तारखा .

आषाढी एकादशी यंदा 10 जुलैला आहे. त्याच्या निमित्त तयारीला सुरूवात झाली आहे. वारकर्‍यांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 14 जून रोजी पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आले आहे.