उद्धव ठाकरे, संजय राऊत । File Photo

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. 'शिवसेनेची बुलंद तोफ बाहेर आली', 'शिवसेनेचा ढाण्या वाघ आला' अशा शब्दांमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, आता शिवसैनिकांसह प्रसारमाध्यमांनाही उत्सुकता आहे. ती म्हणजे संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदांमधून आणि दैनिक 'सामना' संपादकीयातून (Samaana Editorial) काय लिहीतात, बोलतात. संजय राऊत यांची ऑर्थर कारागृहातून कालच सुटका झाली. त्यानंतर आजच्या सामना संपातकीयात ते काय लिहीतात याबातब उत्सुकता होती. मात्र, आजच्या सामना संपादकीयात विशेष असा कोणता मुद्दा घेतलेला दिसत नाही. प्रामुख्याने राजकारण, केंद्रीय तपास यंत्रणांचे वर्तन याबाबत कोणतेही भाष्य आजच्या अंकामध्ये पाहायला मिळत नाही.

काही काळ विश्रांती?

कारागृहातून बाहेर पडताना प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, सध्या माझी तब्येत काहीशी बरी नाही. त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन लवकरच मी सक्रीय होईल. संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहता बोलले जात आहे की, पुढचे काही दिवस संजय राऊत फारसे सक्रीय असणार नाहीत. स्वत:ची वैद्यकीय तपासणी करुन ते काही काळ विश्रांती घेतील. त्यानंतरच ते सक्रीय होतील. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांनाही सामोरे जातील आणि विरोधकांचीही समाचार घेतील. (हेही वाचा, तब्बल 100 दिवसांनंतर Sanjay Raut तुरुंगातून बाहेर; शिवसैनिकांमध्ये उत्साह, जल्लोषात केले स्वागत (Watch Video))

आजच्या 'सामना' संपादकीयात काय?

दैनिक सामनाच्या आजच्या संपादकीयामध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला पूर्ण झालेल्या सहा वर्षांबाबत आढावा घेऊन भाष्य करणयात आले आहे. नोटबंदीच्या निर्णयाचा झालेला फायदा मोदी सरकारला जनतेला सांगता आला नाही. तसेच, नोटबंदीचा हेतूही साध्य झाला नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. 'नोटाबंदीमुळे ना सरकारच्या अपेक्षेप्रमाणे काळा पैसा नष्ट झाला ना बनावट नोटांचा सुळसुळाट पूर्ण थांबला. डिजिटल, कॅशलेस व्यवहार यात मोठी वाढ झाली, पण रोख व्यवहारांचे प्रमाण मागील पानावरून पुढे तसेच सुरू आहे,' अशा शब्दांमध्ये सामनातून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.