Sanjay Raut (Photo Credit : Twitter)

मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून आज संध्याकाळी बाहेर आले. सायंकाळी पाचच्या सुमारास राऊत यांच्या वकिलांनी जामीनपत्र आर्थर जेलरोडला पाठवले आणि सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राऊत कारागृहाबाहेर आले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत यांनी, ‘आम्ही लढवय्ये आहोत, लढत राहू’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कला भेट देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राऊत यांना जामीन मिळाल्याची बातमी समजताच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला होता. कार्यकर्त्यांनी विशेष न्यायालयाबाहेर जमून फटाकेही फोडले. उपनगरातील भांडुपमधील संजय राऊत आणि वांद्रे येथील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेरही अनेक शिवसैनिक जमा झाले आहेत. राऊत यांच्या समर्थकांनी त्यांचा बंगला सजवण्यास सुरुवात केली असून, मोठी साउंड सिस्टीम आणण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर आणि राऊत यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला आहे. महिला पोलिसांचा ताफाही तैनात करण्यात आला आहे.

पत्रा चाळ (सदनिका) पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यावर संजय राऊत 31 जुलैपासून कोठडीत होते. संजय राऊत यांनी जामीन अर्ज दाखल केल्यानंतर, जामिनाचा आदेश रद्द करून त्याला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचे ईडीच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय असा आदेश देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. यासोबतच या प्रकरणाच्या सुनावणीसाठी गुरुवारची तारीख निश्चित केली आहे. (हेही वाचा: Uddhav Thackeray On Sanjay Raut: 'संजयला अभिनंदन सांग', उद्धव ठाकरे यांचा 'मातोश्री'हून थेट फोन)

आज राऊत यांना दिलासा देत, जामिनावर तातडीने स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार देऊन त्यांना जमीन मंजूर केला. राऊत यांच्या वकिलाने सांगितले होते की, त्यांची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी ते संध्याकाळपर्यंत औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. कनिष्ठ न्यायालयाने खासदारांचे सहकारी आणि सहआरोपी प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर केला आहे.