Matru Din 2020: कठीण काळात आईसारखे पाठीशी उभे राहणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिल्या खास शुभेच्छा!
Maharashtra Police & Sanjay Raut (Photo Credits: PTI/ Facebook)

आज 10 मे रोजी यावर्षीचा मातृदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सामान्यांपासून सेलिब्रिटी आपल्या आईसोबतचे फोटोज शेअर करत मदर्स डे च्या शुभेच्छा देत आहेत. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मदर्स डे निमित्त मातेप्रमाणे काळजी घेणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुरेख संदेशासह महाराष्ट्र पोलिसांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राकडून दिल्या आहेत. अडीअडचणीच्या काळात, संकटसमयी पोलिस आपल्या संरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत असतात. त्यांच्यावर अनेक हल्ले होतात तरी देखील कर्तव्य बाजूला न सारता सारं विसरुन झटणारे पोलिस अगदी आईसारखे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

"काहीही हरवलं, कुणाशीही भांडण झालं... आम्ही तुमच्याकडे धाव घेतो, कारण मदत मिळण्याची खात्री असते. सगळ्यांशी जुळवून घेऊन, झालेला अपमान गिळून, तुम्ही आमच्यासाठी झटत असता, स्वतःला विसरुन अगदी आईसारखे..." असे छानसे ट्विट करत संजय राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्रातर्फे पोलिसांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलातील 786 कर्मचारी COVID-19 पॉझिटीव्ह; 88 अधिकाऱ्यांसह 698 पोलिसांचा समावेश)

संजय राऊत ट्विट:

कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटातही पोलिस आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. दरम्यान पोलिस दलातील एकूण 786 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 76 जण रिकव्हर झाले असून 703 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 7 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. परंतु, तरी देखील लॉकडाऊन काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या पोलिसांवरील हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटना थांबण्याची गरज आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिसांना सहकार्य केल्यास या कठीण प्रसंगातून लवकर बाहेर पडण्यास नक्कीच मदत होईल.