महाराष्ट्रातून देशाच्या परिवर्तनाची सुरुवात झाली, शिवसेनेचं सूर्ययान दिल्लीतही लँड होईल: संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

बहुमत नसलेला मुख्यमंत्री लादण्याचा केंद्राकडून झालेला अघोरी प्रयत्न महाराष्ट्राने हाणून पाडला. या निमित्ताने देशाच्या परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून सुरु झाली, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आम्ही सुरुवातीपासून दावा करत होतो की, शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे सूर्ययान विधिमंडळाच्या सहाव्या मजल्यावर यशस्वी लँड होईल. या दाव्यावर अनेक लोक हसत होते. मात्र, अखेर आमचे सूर्ययान (Surya Yaan) यशस्वी लँड झालेच. आता आम्ही हसत आहोत, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.

दरम्यान, या वेळी बोलताना शिवसेनेचे सूर्ययान दिल्लीतही यशस्वी लँड होईल असे भाकीतही संजय राऊत यांनी वर्तवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होत आहेत. महाराष्ट्रात ही एक चांगली सुरुवात होत आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आता माझी जबाबदारी काहीशी कमी झाली आहे. आता आपण माझ्या इतर जबाबदारीसाठी मोकळा झालो. उद्यापासून आपण प्रसारमाध्यमांशी फार बोलणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असे महाविकासआघीड सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार चांगले काम करेन. जनतेच्या आपेक्षा पूर्ण करण्यास हे सरकार यशस्वी होईल, असा विश्वासही संजय राऊत यानी व्यक्त केला. (हेही वाचा, अजित पवार यांनी वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली; मस्तवाल हैदोस थांबला, आता सर्व शुभ घडेल: शिवसेना)

एएनआय ट्विट

शिवेसना-भाजप सत्तासंघर्षात शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाची बाजू मांडताना संजय राऊत यांची भूमिक महत्त्वाची ठरली. संजय राऊत यांनी शिवसेना मुखपत्र दै. सामना, ट्विटर आशा माध्यमातून भाजपवर जोरदार शरसंधान साधले. ही भूमिका निभावताना संजय राऊत यांच्यावर अनेकदा टीकाही झाली. पण संजय राऊत मागे हटले नाहीत. ते आपली भूमिका मांडतच राहीले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या जोडीला संजय राऊत यांचेही कौतुक होताना दिसत आहे.