Sanjay Raut And Amit Shah (Photo Credits: FB)

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील एसएसपीएम लाइफटाइम मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे उद्घाटन केले. हा त्यांचा सिंधुदुर्गातील पहिलाच दौरा होता. या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर सडकून टिका केली. तसेच एके काळी ज्या पक्षासोबत युती होती त्या शिवसेनेवरही जोरदार टिका केली. "भाजप हा पक्ष शिवसेनेच्या मार्गाने चालत नाही. तसे करायचेच असते तर आज महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती" असे विधान अमित शाह यांनी सिंधुदुर्गातील कार्यक्रमात केले होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टिका केली आहे. "जेव्हा जेव्हा शिवसेनेला संपवण्याची भाषा झाली तेव्हा शिवसेना अधिक झळाळून उठली आहे" अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले.

"1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली" असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेदेखील वाचा- 'उद्धव ठाकरे यांना मी कधीही वचन दिले नव्हते, सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले'; अमित शाह यांचा शाब्दिक हल्ला

या ट्विटमधून संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अप्रत्यक्षपणे या ट्विटमधून त्यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला. शिवसेनेला संपवायला निघालेल्या काँग्रेसला देखील कसे तोंडावर आपटायला लागले होते असे संजय राऊतांनी या ट्विटमध्ये म्हटले होते.

या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले. "सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवेसनेने राजकारणासाठी सिद्धांत मोडले. जनादेश नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन करण्याचा होता. मात्र उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिले होते. पण मी कधीही काही बंद खोलीत करत नाही. जे करायचे ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही घाबरत नाही जे होते ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असे कोणतेही वचन दिले नव्हते. बिहारमध्ये आम्ही वचन दिले आणि जास्त जागा असूनही नितीश कुमार यांना सांगितल्यानुसार मुख्यमंत्रिपद दिले."