केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कथीत भेटीवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज या कथीत भेटीवर प्रतिक्रिया दिली. अमित शाह आणि शरद पवार यांच्यात भेट झाली किंवा नाही हे मला माहित नाही. परंतू, जर ही भेट झाली असेल तर त्यात गैर काय? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहेत. त्यांना देशातील कोणीही व्यक्ती भेटू शकतो. शरद पवार आणि अमित शाह हे दोन्ही मोठे नेते आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले असतील तर त्यात येवढ काय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शरद पवार आणि अमित शाह यांच्या कथीत भेटीचे वृत्त आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी अमित शाह यांना याबाबत विचारले असता 'सगळाच तपशील बाहेर सांगायचा नसतो' अशी प्रतिक्रिया दिली. शाह यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम अधिकच वाढला. या वक्तव्यातून ही भेट झाली किंवा नाही हे स्पष्ट झाले नाही. परंतू, ती झाली असावी अशी शक्यता मात्र वाढली. दरम्यान, अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन संजय राऊत यांनी टोला लगावला. राजकारणामध्ये झालेलेली कोणतीही भेट गुप्त राहात नसते. ही भेट झाली असेल तर त्याबाबत माहिती पुढे येईल. ही भेट म्हणजे काही गुप्तेश्वर पांडे यांची भेट नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. (हेही वाचा, NCP ने फेटाळले शरद पवार व अमित शाह यांच्या बैठकीचे वृत्त; अशी कोणतीही भेट झाली नसल्याची नवाब मलिक यांची माहिती)
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या जे काही घडले, घडते आहे त्यातून महाराष्ट्राती प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर मलीन झाली आहे. विरोधी पक्षही याचे भांडवल करत आहे. काहीतरी कुरापती काढून हे सरकार पडेल असे विरोधकांना वाटत असेल तर तसे घडणार नाही. महाारष्ट्राची प्रतिमा मलिन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरुन प्रयत्न होत आहेत. परंतू, महाराष्ट्राला देशाला बरेच काही द्यायचे आहे. त्यामुळे उगाच महाराष्ट्राच्या तंकड्यात तंगड घालू नये, असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी दैनिक सामनामधील रोखठोक या सदरात लिहिलेल्या लेखावरुनही जोरदारचर्चा सरु झाली. त्यावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी म्हटले की, कालचा विषय कालच संपला. मी लिहीले. जे लिहिले ते वास्तव आहे. या आधी टाईम्स ऑफ इंडियाला सुप्रिया सुळे यांनीही एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतही त्यांनी असेच म्हटले होते, असे राऊत यांनी सांगितले.