Sanjay Raut met Priyanka Gandhi: राहुल भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांच्यात खलबतं; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यात आज (8 डिसेंबर)प्रीदर्घ काळ चर्चा झाली. संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट कालच (7 डिसेंबर) घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यामुळे शिवसेना लवकरच युपीएत सहभागी होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. राजधानी दिल्ली येथे या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर बैठक झाली. या बैठकीचा तपशील संजय राऊत यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना दिला. प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्रात काय करता येईल, याबाबत चर्चा झाली असल्याचे राऊत म्हणाले.

शिवसेना युपीएमध्ये सहभागी होईल का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना आजही विचाला. यावर संजय राऊत यांनी उत्तरादाखल म्हटले की, प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती त्या राहुल गांधी यांना देतील. तर मी या दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देईन. आमची काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे. ज्या ठिकाणी आगामी काळात निवडणुका आहेत. त्या ठिकाणी परिस्थिती कशी आहे यावर पुढील गोष्टी ठरवल्या जातील असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Shiv Sena in UPA: शिवसेना लवकरच यूपीएचा घटक पक्ष? संजय राऊत लवकरच राहुल, प्रियंका गांधी यांना भेटण्याची शक्यता)

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे राहुल गांधी यांना मंगळवारी आणि प्रियंका गांधी यांना बुधवारी भेटण्याची शक्यता आहे. शिवसेना युपीएमध्ये सहभागी झाल्यास उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब आदी राज्यांमध्ये काँग्रेसला सहकार्य करण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी युपीए कुठे आहे असा सवाल केला होता. यावर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, शिवसेनेने म्हटले होते की, केंद्रात काँग्रेस हाच सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. भाजपला पर्याय द्यायचा तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच तो देता येऊ शकतो. काँग्रेसला वगळून युपीएचा विचार करणेही अशक्य असल्याचेही शिवसेनेने म्हटले होते.