चौकशीतून सत्य काय ते पुढे येईल. आज मला काहीही बोलायचे नाही. माझं काम पूर्वीप्रमाणेच सुरु राहील, असे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) नाव आल्यापासून गेले प्रदीर्घ काळ नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज पोहरादेवी (Poharadevi ) येथे दाखल झाले. तेथे त्यांनी सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहीर संवाद साधला.
या वेळी बोलताना संजय राठोड म्हणाले, आमच्या बंजारा समाजातील मुलीसोबत जे घडले ते अत्यंत वाईट आहे. त्या चव्हाण कुटुंबीयांच्या (पूजा चव्हाण कुटुंबीच्या) दु:खात मी सहभागी आहे. आज मला काहीही बोलायचे नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. या चौकसीतूनच जे काही सत्य पुढे यायचे ते येईल, असेही संजय राठोड म्हणाले. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताला तोबा गर्दी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवाहनाचा पोहरादेवी येथे फज्जा)
पुढे बोलताना संजय राठोड यांनी सांगितले की, गेली 30 ते 40 वर्षे मी सामाजिक जिवनामध्ये काम करतो आहे. एका घटनेमुळे मला रॉन्ग बॉक्समध्ये उभे केले जात आहे. एका घटनेमुळे माझे सामाजिक, राजकीय जीवन उद्ध्वस्त केला जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही संजय राठोड यांनी सांगितले. आपण प्रसारमाध्यमांतून सांगत आहात की मी गायब झालो आहे म्हणून परंतू, गेली 10 ते 15 दिवस मी गायब नव्हतो. माझ्या मुंबईतील घरातून माझ माझ्या विभागाचे काम सुरु होते. सरकारी काम कोठेही थांबले नव्हते. मलाही घर आहे. माझ्या पत्निला रक्तदाबाचा त्रास आहे. उगाच तुम्ही एका घटनेवरुन माझे करीअर उद्ध्वस्त करु नका, असेही राठोड यांनी या वेळी सांगितले.
पूजा चव्हाण आत्महत्या या हायहोल्टेज प्रकरणाच्या चर्चेनंतर वनमंत्री पोहरादेवी येथे आले होते. या ठिकाणी पोलिसांनी पोहरादेवी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. वनमंत्री राठोड आणि त्यांची समाजात असलेली लोकप्रियता, समाजाचे आणि पक्षाचे कार्यकर्ते आदींमुळे या परिसरात गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस तैनात करण्यात आल होता. मुख्य रस्त्यावर बॅरीकेट्स लावण्यात आले होते. या परिसरात बॉम्बशोधक पथकही दाखल झाले होते. मात्र, असे असले तरी सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला तो उडालाच.