कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी आल्यापासून राज्याचा आणि संबंध देशभरातीलच आरोग्य क्षेत्र चर्चेत आहे. कधी नव्हे ते नागरिक वैद्यकीय व्यवसाय आणि त्यात होत असलेला काळाबाजार याकडे काळजीपूर्वक पाहू लागले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काळाबाजार करणारेही चांगलेच उघडे पडत आहेत. सांगली (Sangli ) येथील इस्लामपूर (Islampur) येथूनही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राप्त तक्रारीवरुन इस्लामपूर पोलिसांनी डॉक्टर योगेश वाठारकर (Dr. Yogesh Watharkar) यांना अटक केली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवणे. तसेच, दोन दिवस त्याच मृत रुग्णांवर तो जिवंत असल्याचा भासवत केवळ पैशांच्या लोभापाई उपचार करणे हे दोन प्रमुख आरोप डॉ. वाटारकर यांच्यावर आहेत. मृत रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर यांना अटक झाली.
प्राप्त माहितीनुसार, डॉ. योगेश वाठारकर हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअर हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. या रुग्णालयात पाठीमागील दीड वर्षांपासून कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांवर उपचार केले जातात. साधारण 24 फेब्रुवारी या दिवशी तक्रारदारा सलीम शेख यांची आई सायरा शेख ( वय 60) यांना उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. वाठारकर यांनी उचार केले. दरम्यान, उपचार सुरु असतानाच 8 मार्च रोजी सकाळी 11.45 वाजणेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सायरा यांचा मृत्यू होऊनही डॉ. वाटारकर यांनी सलीम शेख अथवा त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना दिली नाही. उलट रुग्ण जिवंत असल्याचे भासवत त्यांच्यावर उपचार सुरु ठेवले.
दरम्यान, डॉ. वाठारकर यांनी दोन दिवसांनी सायरा शेख यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. परंतू, पाठिमागील दोन दिवसांमध्ये डॉक्टरांनी आईच्या प्रकृतीबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने कुटुंबीयांचा आगोदरपासून संशय बळावला होता. पुढे डॉक्टर वाटारक यांनी आपण सायरा शेख यांच्यावर 10 मार्च पर्यंत उपचार केले असे सांगत बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच, या उपरांसाठी 41,289 रुपयांचे वाढीव बिल तयार केले. बिलाची रक्कमही कुटुंबीयांकडून जमा करुन घेतली. त्यानंतर सायरा शेख यांच्या कुटुंबीयांनी वाढीव बिलाचा उल्लेख करत पोलिसांत तक्रार दिली. (हेही वाचा, Delta and Delta Plus Variants FAQs: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टस: वारंवार विचारले जाणारे प्रश्न आण त्यांची उत्तरे)
इस्लामपूर पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा डॉ. वाटारकर यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 406.420.464.297 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक असे की, आधार हेल्थ केअर रुग्णालयात सायरा शेख यांचा मृत्यू 8 मार्च रोजी झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषद दप्तरी झाली आहे. त्यामुळे सायरा शेख यांचा मृत्यू 8 मार्च रोजी झाला हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे सहाजीकच अपेक्षीत होते की, हे सायरा शेख यांचा मृतदेह त्याच दिवशी कुटुंबीयांकडे सपूर्त होणे. परंतू, तसे न होता त्यांचा मृतदेह 10 मार्चला कुटुंबीयांच्या ताब्यात मिळाला.त्यामुळे मृत रुग्णाला जिवंत भासवून उपचार करणे आणि मृतदेहाची विटंबना झाल्याचे पुढे आले. डॉ. वाठारकर याचे कृत्य पुढे आले.