गेला आठवडा मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. याचा सर्वात जास्त फटका बसला आहे तो मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना. सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड शहर तर पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. कृष्णा कोयनेला आलेल्या पुरामुळे सांगली (Sangli) शहरात 2005 पेक्षा भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर शहरांतील 51 हजार 785 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यासाठी कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर, एनडीआरएफच्या पथकांची मदत घेण्यात आली.
सध्याची परिस्थिती पाहता कोल्हापूरच्या राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णतः थांबण्यात आला आहे. आज सकाळी नौसेनेच्या 2 विमानातून एका बोटीसह 22 जणांचे पथक, तसेच गोवा कोस्टगार्डचे बोटीसह हेलिकॉप्टर कोल्हापूर सांगली भागात दाखल झाले असून. बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. प्राधान्याने ही मदत प्रयाग-चिखली सारख्या पूरग्रस्त ठिकाणी पाठवली असून, आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरु करण्यात येणार आहे. सांगली मधील नदीकाठी असणाऱ्या सुमारे 31 हजार नागरिकांचे, तर 4 हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. (हेही वाचा: पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची बैठक; आरोग्य यंत्रणेला सर्तक राहण्याचे आदेश)
दरम्यान याधील 2005 साली आलेल्या पुरावेळी सांगलीच्या कृष्णेची पातळी 53.9 इतकी झाली होती. यावर्षी हा विक्रम मोडत ही पातळी 54.2 इतकी झाली आहे. सध्या कराडपासून पुढे कोल्हापूर आणि सांगली, मिरज पासून पुढे नृसिंहवाडीला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. सांगली जिल्हा स्तरावर 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पुरासंबंधी कोणत्याही माहितीसाठी अथवा तक्रारीसाठी 09370333932 या नंबरवर संपर्क करता येईल.