Maharashtra Monsoon 2019: पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची बैठक; आरोग्य यंत्रणेला सर्तक राहण्याचे आदेश
CM Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

कोल्हापूर आणि सांगली शहराला आजही पूराच्या पाण्याने वेढलेले आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे बंद केल्याने पाण्याचा निचरा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढला तर अडचणी वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूराच्या पूरस्थितीवर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली आहे. सातार्‍यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तर बचावकार्य सुरू ठेवण्यासाठी नौसेनेची मदत घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये रत्नागिरी, पालघर, सांगली, पुणे येथील पूरपरिस्थितीचाही आढावा घेतला आहे. Kolhapur Rains: पूराच्या वेढयात अडकलेल्या कोल्हापूरवासीयांना एअर लिफ्ट करण्यासाठी नौसेनेची हेलिकॉप्टर्स रवाना

सातार्‍यातील रेठरे गावाचं स्थलांतर करण्यात आलं असून कृष्णा नदीला महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि जेवण देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच तातडीने पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसेच पूरात नुकसान झालेल्या पीकांचा आढावा घेऊन मदत जाहीर केली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेलादेखील सज्ज राहण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतून तात्काळ औषध पुरवठा केला जाणार असल्याचं आणि त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती दिली आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती 

कोल्हापूरात पावसाच्या थैमानामुळे आलेल्या महापूरातून नागरिकांची सुटका करण्यासाठी NDRF, SDRF सह लष्कराची मदत घेतली जाणार आहे. कोल्हापूरात पहिल्यांदाच नौसेनेच्या माध्यमातून एअरलिफ्टद्वारा नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यासाठी सारी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे.