हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण 15 इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. 701 कि.मी लांबीपैकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समूद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता. इगतपुरी (600 कि.मी.) वाहतूकीस खुला झाला आहे.
हजारो वाहने समृद्वीचा प्रति दिन वापर करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी 15 महामार्ग पोलिसांच्या केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळांकडे केली होती. त्यानुषंगाने महामंडळाकडून 15 स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पोलिसांना देण्यात येणाऱ्या वाहनांचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे हेदेखील उपस्थित होते.
पोलिसांची कार्यक्षमता वाढून त्यांना अधिक वेगाने प्रवास करता यावा यासाठी दिलेली ही… pic.twitter.com/Ya4vLEHgJ9
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 27, 2023
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळ तत्पर असून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महामार्गावरील घटनांबाबत सेंट्रल कंट्रोल रुम स्थापित केले असून त्याद्वारे शीघ्र प्रतिसाद वाहने, 108 रुग्णवाहिका, महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इत्यादींना अपघातांची/इतर घटनांची सूचना देण्यात येते. जेणेकरून घटनास्थळी जलदगतीने मदत पोहोचविणे सोयीचे होते. प्रवाशांना तातडीने मदत मिळण्याकरिता महामार्गावर हेल्पलाईन नंबरचे फलक लावण्यात आले आहेत.याशिवाय, समृद्धी महामार्गावर घटना व्यवस्थापन (Incident Management) सुरळीत होण्याच्या अनुषंगाने स्टॅण्डर्ड आपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार केलेली असून त्याचप्रमाणे घटना व्यवस्थापन प्रतिसाद प्रणाली मार्फत कामकाज पाहिले जाते. (हेही वाचा: Chhagan Bhujbal on Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावरुन छगन भुजबळ आक्रमक, शिंदे समिती बरखास्तीची मागणी)
याव्यतिरिक्त रहदारी व घटना नियंत्रणासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम (ITS) महामार्गावर स्थापित केली जाणार आहे. महामार्गावरील चालकाचे लक्ष वेधण्यासाठी प्रति 25 कि.मी वर रम्बर्लस स्ट्रीप, जागोजागी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे व विविध शिल्प उभारण्यात आले आहेत. तसेच पथकर नाक्यावर वेग मोजण्याचे भोंगे (Hooters) लावण्यात आले असून त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणारी वाहने ओळखून त्या चालकाचे प्रादेशिक परिवहन (RTO) विभागामार्फत समुपदेशन केले जाते.
समृद्धी महामार्ग होणार आता अधिक सुरक्षित ! #EknathShinde #Shivsena pic.twitter.com/tkiR0euRpW
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) November 27, 2023
महामार्गावर बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली असून वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने-21, रुग्णवाहिका-21, ई.पी.सी गस्त वाहने-14, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्रे-13, 30 टन क्षमतेची क्रेन- 13, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत- 142 सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.