Chhagan Bhujbal on Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावरुन छगन भुजबळ आक्रमक, शिंदे समिती बरखास्तीची मागणी
Chhagan Bhujbal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयक केलेल्या मागण्या आणि त्याला राज्य सरकारचा मिळणारा पाठिंबा, यावरुन ओबीसी नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने कुणबी नोंदी आणि मराठा आरक्षण यासाठी स्थापन केलेली शिंदे समितीच बरखास्त करा अशी मागणी भूजबळ यांनी केली आहे. या समितीला राज्यभर नोंदी तपासण्याची संमती नव्हती. त्यामुळे ती रद्द करण्यात यावी. तसेच, सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) आम्ही मान्य करणार नसल्याचा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये (OBC Reservation) येत नसल्याचा पुनरुच्चारही भुजबळांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन Raj Thackeray On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी कोण, कालांतराने पुढे येईल- राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. या दौऱ्यांतून मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा मिळतो आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनीही ओबीसी समाजाच्या हक्कासाठी राज्यभर दौरे आयोजित करुन जरांगे यांना विरोध सुरु केला आहे. ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत. ज्या सापडल्या आहेत आणि त्या आढळून येत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला आमचा विरोध नाही. पण सरसकट अशा प्रकारची प्रमाणपत्रे द्यायला आमचा तीव्र विरोध आहे, असेही भूजबळ यांनी म्हटले.

छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमली त्याला आमची हरकत नाही. पण या समितीला राज्यभर जाऊन पुरावे पडताळणयाची संमती नव्हती. आता जवळपास सर्वच प्रमाणपत्रांवर कुणबी असे लिहीले जात आहे.त्यामुळे आपला विरोध हा मराठा समाजाला नव्हे तर झुंडशाहीला असल्याचे ते म्हणाले. आज हे लोक (मराठा आंदोलक) सांगत आहेत आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करु नका. पण बीड कोणी जाळले? आजवर भुजबळ यांनी कधी टायर जाळला का? की कधी दगड मारला? इतरांना जसा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. तसाच अधिकार भुजबळांनाही आहे, असेही ते म्हणाले.

आपण कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. पण म्हणून आमच्यावरील अन्यायही सहन करणार नाही. बीडमध्ये नेमके काय झाले याची माहिती गृहमंत्र्यांनी राज्यातील जनतेला द्यायला हवी. आमच्यावर आरोप केले जात आहेत, भुजबळांच्याजवळच्या मंडळींनी जाळपोळ केली. गृहमंत्र्यांनी याचा खुलासा करवा, बीडमध्ये नेमके काय झालं. आज त्या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस महिला हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याला कोण जबाबदार? आज पोलिसांना पाठिंब्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.