Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई ड्रग्ज क्रूझ पार्टीत कथित अटक केल्यानंतर चर्चेत आलेले मुंबई नार्कोटिक्स सेल (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत आहे. समीर वानखेडे एनसीबीमध्ये मुदतवाढ घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाल्यापासून समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही अनेकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर खुलेआम गंभीर आरोप केले आहेत. या वादांमुळे समीर यांना मुदतवाढ घ्यायची नसल्याचे समजते.

समीर वानखेडे यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपत होता, मात्र त्यांना डिसेंबरपर्यंत चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या पथकाने ऑक्टोबरमध्ये क्रूझवर छापा टाकला होता. यादरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचा तपास आणि चौकशीच्या आधारे एकूण 20 जणांना अटक करण्यात आली. यापैकी काही मोठी नावे होती आणि काही ड्रग्ज पेडलर आणि सप्लायर्सनाही अटक करण्यात आली होती.

आता आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नंतर एनसीबीने समीर वानखेडे यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणासह सहा खटले मागे घेतले. एनसीबीच्या या कारवाईवर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, आपल्या कार्यकाळात समीर वानखेडे यांनी ऑगस्ट ते डिसेंबर 2020 दरम्यान, 96 लोकांना अटक केली आणि 28 गुन्हे दाखल केले. 2021 मध्ये, त्यांनी 234 लोकांना अटक केली, 117 प्रकरणे नोंदवली, सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलो ड्रग्ज जप्त केले आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता गोठवली. एनसीबीने याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा: मॅट्रीमोनियल साईटवर 20 हून अधिक महिलांची फसवणूक; अडीच कोटी लुबाडले, आरोपीला ठाण्यातून अटक)

समीर वानखेडे यांनी NCB मध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त एसपी म्हणून काम केले होते. नंतर त्यांची कस्टम्सचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि ते मुंबई विमानतळावर तैनात झाले. मुंबई एअर इंटेलिजेंस युनिटमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक सेलिब्रेटींना पकडले जे सीमाशुल्क चुकवत होते.