Sambhaji Bhide | Twitter

देशातील महापुरूषांबद्दल करण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुमार महर्षी यांनी जनहित याचिका केली असून त्यावर आज सकाळी खंडपीठासमोर तातडीची सुनावणी पार पडणार आहे.  (हेही वाचा - Delhi Services Bill: दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार, काँग्रेस आणि आपकडून व्हिप जारी)

या याचिकेद्वारे कुमार महर्षी यांनी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमधून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांबाबतचा प्रसार रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांतून अपमानास्पद टिप्पणी करण्यापासून मनाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याचे मागणीही याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली आहे.

अमरावती येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. तसंच त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यांच्याविरोधात राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.