मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने लढा दिला होता. आज आरक्षणाच्या निर्णय बाजूने लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कायदेशीररित्या असा निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्ट करत मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आहे. यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. याच मुद्द्यावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसेच राज्य सरकारला याची जबर किंमत मोजावी लागणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विनोद पाटील यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे राज्य घटनेच्या कलम 14 च्याविरोधात आहे, असे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने माराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णायानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने पेट घेतला आहे. दरम्यान समरजितसिंह घाटगे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण रद्द केले आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडी सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. याची जबर किंमत महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. हे देखील वाचा- Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक; पंढरपुरात तरुणांनी अर्धनग्न होऊन केलं सामुहिक मुंडण आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर, मराठा समजाला आरक्षण मिळवून देण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.