Salman Khan House Firing: सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Firing outside Salman Khan's house, PC Pixabay

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याच्या पोलीस कोठडीतील कथित आत्महत्येची महानगरदंडाधिकाऱ्यांसह राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) चौकशी सुरू आहे. या दोन्ही चौकशींची सद्यस्थिती काय आहे ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केली आहे. तसेच या तपासाची स्थिती स्पष्ट करणारा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.  पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चित्रीकरण आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या फोनमधील घटनेशी संबंधित नोंदी जतन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सरकारला हे आदेश दिले.  (हेही वाचा - Salman Khan House Firing: सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट कॅनडात रचला; मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड)

या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळीही अनुजच्या मृत्यूला 14 दिवस उलटून गेले असून अद्याप कोठडी मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आग्रह अनुजच्या कुटुंबीयांनी न्यायालयाकडे केला. या प्रकरणी अपघाती मृत्यू नोंद करण्यात आली असून राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे. दुसरीकडे, कायद्यानुसार, थापनच्या मृत्यूची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.

पंजाबमधील सुखचैन गावात वास्तव्यास असलेली अनुज याची आई रिता देवी यांनी राज्य सरकार आणि मुंबई गुन्हे शाखेसोबतच अभिनेता सलमान खान यालाही या याचिकेत प्रतिवादी केले आहे. अनुज याने पोलीस कोठडीत आत्महत्या केलेली नाही, तर पोलीस कोठडीत केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी याचिकेत केला आहे.