Reservation | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) पुन्हा आंदोलनं आणि मोर्चाची सत्र सुरू झाली आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वाखाली मूक आंदोलन पार पडल्यानंतर काल त्यांनी काही मागण्या पूर्ण झाल्याने पुढे महिनाभर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला पण कोल्हापुरात सकल मराठा समाजाने मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे. आज त्यांनी कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam Aandolan) केले. सकाळी 11 च्या सुमारास ताराराणी चौकात हे आंदोलन सुरू झाले आणि आता मूक नाही तर ठोक मोर्चा निघेल असं सांगत काही वेळ वाहतूक रोखली. Maratha Reservation: 'एकवीस दिवस काय एक महिना घ्या पण मागण्या पूर्ण करा अन्यथा..!', संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशारा.

कोल्हापूरामध्ये सकल मराठा समाजाच्या या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी दिली जात नव्हती. त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याची देखील परवानगी मागितली होती मात्र सकल मराठा समाजाने ही विनंती अमान्य करून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या तरूणांनी घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. दरम्यान 26 जून पर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्या नाहीत तर 26 जून कोल्हापूरातूनच उग्र आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरी मध्ये राज्य सरकारकडून आरक्षण देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण अवैध ठरवले परिणामी मराठा समाजाच्या अनेक तरूण मंडळी आता याविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी एका शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आरक्षण देण्याचा मार्ग मोकळ्यासाठी पत्र दिले आहे.