मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या पत्रानंतर आता आणखी एक धक्कादायक पत्र समोर आले आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (NIA) कोठडीत असलेले मुंबई पोलीसचे निलंबित उपनिरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या वकिलांनी, बुधवारी माध्यमांसमोर वाझे यांचे कथित पत्र सादर केले. या पत्रात वाझे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. महत्वाचे म्हणजे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्याला पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केला आहे.
एनआयएला दिलेल्या लेखी निवेदनात सचिन वाझे यांनी हे आरोप केले आहेत. वाझे यांचे म्हणणे आहे की, अनिल देशमुख यांनी त्यांना सांगितले होते की, शरद पवार यांची इच्छा होती की वाझे यांना काढून टाकावे. परंतु देशमुख पवार यांच्याशी याबाबत बोलून त्यांचे मन वळवतील व त्यासाठी त्यांनी वाझे यांच्याकडे 2 कोटींची मागणी केली होती. आपण इतकी मोठी रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी देशमुखांना सांगितले असता, त्यांनी ही रक्कम नंतर देण्यास सांगितले असल्याचेही वाझे यांनी पत्रात म्हटले आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये देशमुख यांनी त्यांना बोलावले होते, असा वाझे यांनी पत्रात दावा केला आहे. यावेळी देशमुख यांनी वाझेला 1650 बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे वसूल करण्यास सांगितले होते. त्यावेळी वाझे यांनी ही गोष्ट आपल्या आवाक्याबाहेरची असल्याचे सांगितले होते. सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. (हेही वाचा: Sachin Waze ची आता मुंबईत बार, रेस्टॉरंट मध्ये 100 कोटींच्या वसुलीच्या आदेशा प्रकरणी CBI कडून NIA कोठडीत चौकशी होणार)
या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने CBI ला दिले आहेत. या प्रकरणात आता NIA बरोबरच आता CBI कडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना आता 9 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात राहावे लागेल. एनआयएच्या मागणीवरून विशेष कोर्टाने त्याच्या कोठडीत दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. वाझे यांचे वकील आबाद पोंडा यांनी कोर्टाला सांगितले की, एनआयएच्या उपस्थितीत सीबीआयची चौकशी दोन्ही एजन्सीसाठी फायदेशीर ठरेल.