ग्रामीण भागात (Rural Area) केलेल्या स्वच्छता विषयक उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला (Maharashtra) एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. राज्य पातळीवरील दोन, जिल्हा श्रेणीत जळगाव तर ग्राम पंचायत श्रेणी मध्ये यवतमाळ व भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे. महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत दिनाचे औचित्य साधून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने, ग्रामीण स्वच्छताविषयक विशेष कामगिरीबद्दल ‘स्वच्छता दिवस पुरस्कार 2020’ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने ही चमकदार कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार पुढील प्रमाणे –
- जलशक्ती मंत्रालयाने 15 जून ते 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत आयोजित केलेल्या ‘सामुदायिक शौचालय अभियान’ अंतर्गत, ग्रामीण भारत सुरक्षित शौचालय निर्माणासाठी महाराष्ट्राला देशात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- यावर्षी 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान केंद्र सरकारने ‘गंदगी मुक्त भारत अभियान’ राबविले. यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेने स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त श्रमदान केले. म्हणून राज्याला श्रमदान प्रकारात तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- सामुदायिक शौचालय अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्याला देशात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये कान्हाळगाव आणि बोरीखुर्द ग्रामपंचायतींची चमकदार कामगिरी आहे.
- स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियानात भंडारा जिल्ह्यातील कान्हाळगाव ग्रामपंचायतीस राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- सामुदायिक शौचालय अभियानामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बोरी खुर्द या ग्राम पंचायतीस देशात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (हेही वाचा: राज्यात Remdesivir चा काळाबाजार होण्यासह रुग्णांवर मृत्यू ओढावत असल्याने औषध मोफत उपलब्ध करुन द्यावे; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी)
राज्यातील सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांचे तसेच गावकरी व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तसेच राज्यालाही दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.