मुंबईकडे देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिले जाते, विविध उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात दररोज हजारोंच्या संख्येने लोक दाखल होत असतात. मात्र भारतात्तील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या या शहरात रस्ते, वाहतूक, पूर, कचरा अशा अनेक समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. एकीकडे जगण्यासाठी मुंबईकर रोजच्या समस्यांना तोंड देत आहेत तर दुसरीकडे टॉयलेटसारख्या गोष्टींवर मुंबईमध्ये तब्बल 90 लाख रुपये खर्च केले जात आहेत. होय, नुकतेच मुंबईत सुमारे 90 लाख रुपये खर्च करुन सर्वांत महागडे जागतिक दर्जाचे आरामदायी शौचालय उभारण्यात आले आहे. या आरामदायी शौचालयाचे उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.
मरीन ड्राइव्ह येथील एअर इंडिया इमारतीच्या जवळ हे शौचालय उभारण्यात आले आहे. हे देशातील सर्वाधिक महागडे शौचालय असल्याचे सांगण्यात येते. ‘क्लीनटेक’स्वच्छतागृहासाठी मुंबई महापालिका, जेएसडब्ल्यू समूह, सामाटेक आणि एनपीसीसीए यांनी पुढाकार घेतला आहे. सौंदर्यपूर्व बांधकाम आणि इंटलिजेंट सॅनिटेशन तंत्रज्ञान हे या शौचालयाचे वैशिष्ठ्य आहे.
हवामानाचा कोणताही परिणाम न होणाऱ्याजेएसडब्ल्यू टिकाऊ स्टील शीट्सपासून या शौचालयाचा मोनोलिथिक फॉर्म बनवण्यात आला आहे. जगभरातील सुप्रसिद्ध स्मारकांच्या आणि वास्तुंच्या बांधकामात या स्टीलचा वापर केला जातो. मरीन ड्राइव्हच्या समुद्र किनाऱ्यावर हे शौचालय असल्यामुळे खारट हवा तसेच पावसाळ्यातील लाटांमुळे त्यांची झीज होणार नाही, अशा पद्धतीने ते बनवले आहे. पाण्याऐवजी नॉर्वेतील जागतिक दर्जाच्या व्हॅक्युम तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छतागृहातील सुविधा ही असून ती सामाटेकने पुरवली आहे. एका फ्लशमागे केवळ 0.8 लीटर पाणी वापरले जाणार आहे, त्यामुळे या शौचालयाच्या प्रत्येक फ्लशमागे 90 टक्के पाण्याची बचत होणार आहे. असे सांगितले जात आहे. तर विजेऐवजी जेएसडब्ल्यू एनर्जीने पुरवलेले सौर पॅनल्स शौचालयाच्या छपरावर लावण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील मरीन ड्राईव्ह इथल्या ओपन जिमवर महापालिकेनं कारवाई केल्यानंतर त्याच जागी हे शौचालय उभा केले आहे. सुरुवातीचे दोन महिने या शौचालयाचा वापर विनामूल्य करता येणार आहे, त्यानंतर मात्र यासाठी शुल्क आकारण्यात येईल.
मुंबईतील अनेक ठिकाणी, मुख्यतो झोपडपट्टयांमध्ये नागरिकांसाठी शौचालयांची उभारणी वेळेवर केली जात नाही. ज्याचा सरासरी खर्च हा 25 ते 30 लाख असतो. मात्र आता उच्चभ्रू लोकांच्या सेवेसाठी तब्बल 90 लाख पेक्षा जास्त खर्च करून हे शौचालय उभारले आहे. पालिकेच्या अशा वागण्याने इतक्या महागड्या शौचालायाबाबत नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.