Mumbai: सँडहर्स्ट रोड स्टेशन वर महिलेला वाचवण्यासाठी RPF जवानाची रेल्वे रुळावर उडी (Watch Video)
RPF जवानाने वाचवले महिलेचे प्राण (Photo Credits: Twitter)

मुंबई लोकल (Mumbai Local) प्रवासादरम्यान होणारे अपघात, जीवघेणे प्रसंग तुम्ही ऐकले असतील. त्याचे व्हिडिओज पाहिले असतील. दरम्यान, आता मुंबईच्या (Mumbai) सँडहर्स्ट रोड (Sandhust Road Station) स्टेशनवरील एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात एक महिला ट्रेनची वाट पाहत असताना अचानक प्लॅटफॉर्मवरुन रेल्वे ट्रॅकवर पडते आणि तिला वाचवण्यासाठी RPF जवान ट्रॅकवर उडी घेतो. आरपीएफ जवानाचे प्रसंगावधनामुळे या महिलेचे प्राण वाचले. अनीशा शेख असे या महिलेचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

अनीशा शेख या मुंबईच्या सँडहर्स्ट रोड स्टेशन च्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ट्रेनची वाट पाहत होत्या. त्या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या प्लॅटफॉर्मवरुन थेट रेल्वे रुळावर पडल्या. रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या RPF जवानाने ही घटना पाहिली आणि स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आणि क्षणाचाही विलंब न करता थेट रेल्वे रुळावर उडी घेतली. मात्र RPF जवानाच्या प्रसंगावधनामुळे महिलेचे प्राण वाचले. श्याम सूरत असे या आरपीएफ जवानाचे नाव आहे. या सर्व पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उपस्थित प्रवाशांनही घटनास्थळी घाव घेतली आणि मदतीचा हात पुढे केला. तसंच ट्रॅकवर येणारी लोकल थांबवण्यासाठी देखील अनेक प्रवाशांनी मोटारमनला इशारा केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ:

या घटनेनंतर आरपीएफ जवान श्याम सूरत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटनांचे व्हिडिओज समोर आले आहेत. अशा प्रसंगातूनच माणुसकीचे दर्शन घडते. (ठाणे: रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ कर्मचाऱ्याने वाचवले प्राण, Watch Video)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिला यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.