Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवार यांची आज ईडी चौकशी; कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनासाठी मुंबई मध्ये दाखल
Rohit Pawar | (Photo Credit - X)

आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांची आज मुंबई मधील ईडी कार्यालयात (ED Enquiry) चौकशी होणार आहे. रोहित पवार चौकशीसाठी येणार असल्याने एनसीपीचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनाच्या तयारीमध्ये आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयापर्यंत येणार आहेत तर शरद पवार देखील रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत पक्ष कार्यालयामध्ये बसणार आहेत. दरम्यान रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केले आहे. तसेच आपण ईडीला सहकार्य देणार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ED Summons MLA Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, 24 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश .

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीच्या कार्यालयांमध्ये ईडीने छापेमारी केली होती. बारामती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणीच रोहित पवारांची ईडी चौकशी होत आहे. याबाबत मागील वर्षी पासून रोहित पवारांना नोटीस बजावण्यात येत आहे. ईडीकडून रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा काही संबंध होता का? याविषयी ही चौकशी होणार आहे.

मुंबई मध्ये शक्तिप्रदर्शन

दरम्यान आज सकाळी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार पक्ष कार्यालयामध्ये 10.30 च्या सुमारास शरद पवारांची भेट घेणार आहेत. सध्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मुंबई मध्ये शक्तिप्रदर्शन करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. 'सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!' असं ट्वीट काल रोहित पवार यांनी करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केले आहे.