![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/08/Tanaji-Sawant.jpg?width=380&height=214)
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत (Rishiraj Sawant) पुणे एअरपोर्ट वरून बेपत्ता झाला आणि त्याचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र काही वेळातच तो सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यावरून ते बॅकॉंकला खाजगी प्लेनने जात होते. दरम्यान तानाजी सावंत यांनी सूत्र हलवली आणि चैन्नई वरून विमान माघारी बोलावलं. काही वेळापूर्वी ऋषीराज सावंत त्याच्या दोन मित्रांसह पुणे विमानतळावर सुखरूप आले आहेत. पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप परतला असल्याचं म्हटलं आहे.
रंजन कुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त यांच्या म्हणण्यानुसार, ऋषिराज सावंत (३२) आणि त्यांच्या दोन मित्रांनी बँकॉकसाठी चार्टर्ड विमान बुक केले होते, परंतु एका निनावी कॉलमुळे त्यांचा प्रवासाचा फज्जा उडाला. दरम्यान ऋषीराज बॅंकॉकला कोणत्या कामासाठी चालले होते? घरी त्याची माहिती का दिली नव्हती याची चौकशी केली जाणार आहे. आम्हाला न सांगता ऋषीराज कसा गेला? आम्ही चिंताग्रस्त झालो होतो. आता त्याच्याबरोबर चर्चा केल्यानंतर यामागचं कारण समोर येईल?” अशी प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. तानाजी सावंतांनी त्यांचा मुलगा दुसऱ्याच्या गाडीतून विमानतळावर निघाल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना कॉल केला होता.
सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 च्या सुमारास पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर धावपळ आणि शोधाशोध सुरू झाली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता.