Auto Rickshaw Fare Hike in Pune: पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता पुण्यात रिक्षाने प्रवास करणं महागणार आहे. पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा भाडेवाढ करण्यासंदर्भातील आदेश दिला आहे. या आदेशानुसार, पुण्यात रिक्षा चालकांना आता 4 रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून रिक्षा चालकांना ही भाडेवाढ करता येणार आहे. याशिवाय, रिक्षा चालकांना पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी 25 रुपये आकारता येणार आहेत. तसेच त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आकारता येणार आहे. महागाईच्या काळात ही भाडेवाढ झाल्याने पुण्यातील सर्व रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी पुण्यात रिक्षा चालक पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे आकारत होते. तसेच त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे आकारण्यात येत होते. मात्र, आता येत्या 1 सप्टेंबर पासून यात बदल होणार आहेत. (हेही वाचा - Free ST Bus Service: ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! आता 75 वर्षांवरील नागरिकांना ST ने मोफत प्रवास करता येणार; 'या' लोकांनाही मिळणार 50 टक्के सूट)
दरम्यान, ज्या रिक्षा चालकांनी आपले मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतले आहे, त्यांच्यासाठीचं ही भाडेवाढ लागू असणार आहे. तसेच ज्या रिक्षा चालकांना मीटर पुनः प्रमाणीकरण करायचे आहे, ते येत्या 31 ऑक्टोंबर प्रमाणीकरण करू शकतात. याशिवाय, जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण करणार नाहीत त्यांच्यावर 1 ते 40 दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल. तसेच किमान 50 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
पुण्यातील रिक्षा चालकांच्या भाडेवाढीनंतर मुंबईतील टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा चालकांनी देखील भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील टॅक्सी युनियनने भाडेदरात 10 रुपयांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सध्या मुंबईमध्ये टॅक्सीचे किमान भाडे हे 25 रुपये इतके आहे. त्यात 10 रुपयांची वाढ करून ते 35 रुपये करावे, असं टॅक्सी युनियनने म्हटलं आहे. भाडेवाढ केली नाही तर 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा चालकांनी सरकारला दिला आहे.