महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई ते सिंधुदुर्ग (Mumbai to Sindhudurg) प्रवास जलद करण्याच्या उद्देशाने, सध्याच्या 523 किमी लांबीच्या रेवस-रेडी किनारी रस्त्याचे (Revas-Redi Coastal Road) नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. हा किनारी मार्ग कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
या प्रकल्पांतर्गत, सध्याचा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे, तर आठ ठिकाणी खाडी पूल बांधण्यात येणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1.6 किमी लांबीचा कुणकेश्वर पूल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी खाडीवरील 1.8 किमी लांबीचा पूल यांचा समावेश आहे.
शासनाने सहा पुलांच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या आहेत. हा मार्ग बांधकामाधीन मुंबई-गोवा महामार्गात विलीन होईल का असे विचारले असता, अधिकाऱ्याने नकारार्थी उत्तर दिले आणि सांगितले की हा संपूर्ण किनारी रस्ता आहे आणि कोणत्याही महामार्गाला जोडणार नाही किंवा विलीन होणार नाही. या प्रकल्पासाठी सुमारे 27,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (हेही वाचा: Landslide in Malshej Ghat: माळशेज घाटात रिक्षा वर दरड कोसळून दोघांचा मृत्यू; 3 जखमी)
सध्या राज्य सरकारने पूल बांधण्यास मान्यता दिली असून, लवकरच त्यांचे काम सुरु होणार आहे. कंत्राटदार नेमल्यापासून तीन वर्षांत हे पूल पूर्ण करावे लागणार आहेत. यासाठी एमएसआरडीसीला महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून (एमएमबी) सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. राज्यातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत, महाराष्ट्र सरकारने प्रमुख महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले आहे. काही मार्ग पूर्ण झाले आहेत आणि लोकांसाठी खुले केले आहेत, तर इतरांवर काम सुरू आहे आणि लवकरच कार्यान्वित होईल.