मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे निधन
Retired Judge B. N. Deshmukh (PC - Twitter)

मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) सेवानिवृत्त न्यायमूर्ती (Retired Judge), माजी आमदार बॅ. बलभिमराव नरसिंगराव देशमुख (Balbhimrao Narsingrao Deshmukh) (बी. एन.) देशमुख काटीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद येथे निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. त्यांच्या पाठीमागे मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. देशमुख यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बी. एन. देशमुख यांची उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सामाजिक प्रश्नावर ऐतिहासिक निर्णय दिले होते. देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अॅड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र होते. (हेही वाचा - गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला साहेबांच्या आवडीचे पदार्थ करून घरातचं फोटोसमोर दोन दिवे लावून अभिवादन करा; पंकजा मुंडे यांचे जनतेला भावनिक आवाहन)

न्यायमूर्ती बी. एन देशमुख यांचे मूळगाव तुळजापूर तालुक्यातील काठी होते. त्यांचे वडील उस्मानाबाद येथे वकिली व्यवसाय करीत असतं. देशमुख यांचे उच्च शिक्षण इंग्लंड मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायास सुरुवात केली. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरु झाल्यानंतर त्यांनी तेथे वकीलीला प्रारंभ केला. 1986 मध्ये देशमुख यांची न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली. 1997 साली ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले.