Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

आजपासून राज्यामध्ये निवासी डॉक्टरांनी (Resident Doctors) पुन्हा प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. यापूर्वी देखील 7 फेब्रुवारीला त्यांनी संपाची हाक दिली होती मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकी मध्ये त्यांनी संपाचा निर्णय मागे घेतला होता. आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्याने आता डॉक्टर पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीमध्ये आहेत.

निवासी डॉक्टरांना दिले जाणारे स्टायपेंट हे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळावे, निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करावी आणि निवासी डॉक्टरांना दिले जाणारे स्टायपेंट ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या स्टायपेंट प्रमाणे देण्यात यावे. अशा या मुख्य मागण्या आहेत.

मागील बैठकी मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या समस्या समजून घेतल्या व 'मार्ड'च्या तीनही मागण्या योग्य असून, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मिळालेले आश्वासन पूर्ण न झाल्याने निवासी डॉक्टर संपावर ठाम होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि संप स्थगित करण्यात आला होता.

आज निवासी डॉक्टरांचा संप संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. जर यामध्ये वेळीच मध्यस्थी झाली नाही तर त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होणार आहे. दरम्यान बीएमसी संचालित वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न निवासी डॉक्टरांनी  आजपासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा सुरू राहण्याची अपेक्षा आहे. सरकारी जेजे रुग्णालयातील सेवा मात्र प्रभावित होतील. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ने दिलेल्या माहितीनुसार आपत्कालीन सेवा सुरू राहतील.