Republic Day 2021: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य सरकारने जारी केल्या सूचना; प्रभात फेऱ्या काढू नये, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खेळांचे आयोजन करू नये, पहा यादी
Republic Day 2021 greetings (PC - Twitter)

भारतामध्ये 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन (Republic Day 2021) साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनावर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट असल्याने हा दिवस कसा साजरा करावा याबाबत शासनाने काही सुचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल याची दक्षता घ्यावी. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना नुकत्याच देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने प्रभात फेऱ्या काढण्यात येऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतरशालेय, आंतरमहाविद्यालय यांच्या स्तरावर वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीद्वारे आयोजन करावे. 26 जानेवारी, 2021 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे, सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात यावा. हा समारंभ आयोजित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे.

विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. तसेच राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक दिनांक 2 मार्च 1991, 5 डिसेंबर 1991 तसेच 11 मार्च 1998 अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित रहाणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग, कार्यालय प्रमुख यांनी द्यावा. राज्यपाल हे सकाळी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर येथे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील.