महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मेहुणीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंडे यांची मेहुणी रेणू शर्मा (Renu Sharma) हिला खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खुद्द धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरून रेणू शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर तिला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रेणू शर्मा ही धनंजय मुंडे यांना 5 कोटी रुपये, दुकान आणि फोन देण्यासाठी धमकावत होती, असा आरोप आहे.
या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेणू शर्माला कोर्टात हजर केल्यानंतर तिला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘गेली दीड-दोन वर्षे मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मागच्यावर्षी माझ्याबाबत खोटी तक्रार दाखल केली गेली त्यानंतर ती मागेही घेतली. माझी सहनशीलता संपल्यावर मी पोलिसांत तक्रार दाखल केली.’ रेणू शर्माने 2021 मध्ये धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र नंतर तिने आपली तक्रार मागे घेतली.
आता रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्सअॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती. मागण्या पूर्ण न झाल्यास बदनामी करू अशी धमकीही तिने दिली होती. या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तिला तीन लाख रुपये दिले होते. तसेच एक महागडा मोबाईलही पाठवला होता. मात्र, त्यानंतरही या रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपयांसाठी तगादा लावला होता. (हेही वाचा: उद्घाटनापूर्वीच सुरू झाला समृद्धी महामार्ग? काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला प्रवास (Watch Video)
त्यानंतर मुंडे यांनी रेणू शर्मा विरुद्ध पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांत दिले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे.