Ashish Deshmukh (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गाच्या (Mumbai Nagpur Expressway) उद्घाटनापूर्वीच काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) महामार्गावर गाडी चालवताना दिसले आहेत. देशमुख यांनी त्यांच्या 200 किमी ड्राईव्हचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवर शेअर केला असून त्यांनी नागपूर ते वाशीम प्रवास केल्याचे सांगितले. व्हिडीओमध्ये समृद्धी महामार्गावर काँग्रेस नेते त्यांच्या बीएमडब्ल्यूमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. जनतेला या महामार्गाचा लाभ घेण्याचे आवाहन देशमुख यांनी व्हिडिओमध्ये केले आहे.

ते म्हणतात, ‘समृद्धी महामार्गामुळे सर्वांची समृद्धी होणार असून, विदर्भाच्या विकासात त्याचा मोठा हातभार लागणार आहे.’ बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते सेलूबाजार पर्यंत पूर्ण झाले आहे. मे अखेरपर्यंत हा महामार्ग खुला करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 2 मे रोजी होणार आहे. राज्यात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे या उद्घाटनाला उशीर झाल्याची माहिती आहे. कोणत्याही स्थितीत जून 2023 रोजी हा संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व महाव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

नागपूर ते शिर्डी दरम्यानचा महत्त्वाकांक्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टप्पा 1 मे 2021 पासून वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) या द्रुतगती मार्गाच्या पुढील बांधकामाचे काम हाती घेत आहे. एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे कामगार साइट सोडून जात आहेत. राज्याच्या ईशान्येकडील भागातील परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे प्रकल्प प्रभावित झाला आहे. याशिवाय, कोविड परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. (हेही वाचा: नाशिककरांना मिळणार 2031 म्हाडा घरे; मे, जून महिन्यात निघणार सोडत)

दरम्यान, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग नकाशामध्ये 50 उड्डाणपूल, पाच बोगदे, 300 वाहने अंडरपास आणि 400 पादचारी अंडरपास समाविष्ट आहेत. 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावे यांना जोडणारा द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सध्याचा 16 तासांवरून आठ तासांपर्यंत कमी होईल. सध्या, नागपूरला जाण्यासाठी NH3 (मुंबई-धुळे) आणि नंतर NH6 (धुळे-नागपूर) ने 800 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.