PMC बँक खातेदारांना दिलासा; वैद्यकीय, शिक्षण, विवाह यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत ठेवीदार काढू शकतात 1 लाख रुपये
PMC Bank (Photo Credits: Twitter)

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँक खातेदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खातेदार आता वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत (Emergency) बँकेतून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. यासाठी त्यांना आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाची मदत घ्यावी लागेल.  मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रातून आरबीआयने ही माहिती दिली. मात्र सामान्य स्थितीत काढण्यात येणाऱ्या पैशांची मर्यादा अद्याप 50 हजार रुपये आहे. याबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, ‘जर एखाद्या ग्राहकाला वैद्यकीय, शिक्षण, विवाह किंवा तत्सम आपत्कालीन परिस्थितीत पैसे हवे असल्यास, तर तो 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला याबाबतचे आदेश दिले आहेत. आरबीआयने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून, सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नेमणूक केली जावी असे सांगितले आहे. वैद्यकीय उपचार, विवाह, शिक्षण, उपजीविका आणि इतर महत्वाच्या समस्या असलेले ठेवीदार, या प्रशासकाकडे 1 लाख रुपये काढण्याचा अर्ज देऊ शकतात. प्रशासक योग्यतेनुसार त्या अर्जाचा निर्णय घेईल.

आरबीआयने इतर खातेधारकांना दिलासा देत बँक खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेत 10 हजारांनी वाढ केली होती. त्यामुळे पीएमसी बँक खातेदारांना आपल्या बँक खात्यातून थेट 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम एकाच वेळी काढता येणार आहे. (हेही वाचा: PMC Bank Crisis: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया विरूद्ध पीएमसी बॅंक खातेदारांच्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता)

दरम्यान, बँकेतून निधी काढण्यावरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांना उत्तर म्हणून आरबीआयने प्रतिज्ञापत्र दाखल केले. ग्राहकांच्या हितासाठी आतापर्यंत कोणती पावले उचललीत, असा सवाल कोर्टाने आरबीआयला केला होता. याबाबत पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी, पीएमसी बँक आणि ठेवीदारांचे हित जपण्यासाठी पैसे काढण्यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले.