दिवसेंदिवस वाढते जाणारे महिलांवरील अत्याचार, चोरीचे गुन्हे यांसारख्या गोष्टींना आळा बसावा यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून परदेशांप्रमाणे आता मुंबईतही नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी (Taxi)आणि रिक्षाच्या (Rickshaw) टपावर दिवे लावण्यात येणार आहे. ज्यामुळे नागरिकांना टॅक्सीत किंवा रिक्षात बसण्याआधीच समजेल की त्या वाहनात कोणी अन्य प्रवासी आहे की नाही. टीव्ही 9 मराठी ने दिलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण देशभरात पहिल्यांदाच हा उपक्रम परिवहन विभागाकडून मुंबईत राबवण्यात येणार आहे.
अनेकदा प्रवाशांना रिक्षा टॅक्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा रिक्षा-टॅक्सीवाले भाडे नाकारतात. तर काहीवेळा रिक्षा टॅक्सीत प्रवाशी असल्याचेही दिसत नाही. रिक्षा चालकांनी गाडी थांबवली नाही तर काही प्रवासी RTO कडे तक्रार करतात. प्रवाश्यांची हिच समस्या लक्षात घेऊन टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर लाल आणि हिरवा दिवा बसवण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा- मुंबई: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी नववर्षात एसी लोकलचं गिफ्ट; लोकलमध्ये कुर्ला कारशेडमध्ये दाखल
तसेच अनेकदा रिक्षा-टॅक्सीमध्ये आधीच असलेल्या अन्य प्रवाशांवर महिलांवर अतिप्रसंग झाल्याच्या घटनाही घडतात. अशा वेळी खबरदाराची उपाय म्हणूनही या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
नव्या वर्षात या योजनांची अंमलबजावणी परिवहन मंडळाकडून करण्यात येणार आहे. सध्या मुंबई उपनगरात टॅक्सीची संख्या 30 हजार आहे. तर रिक्षांची संख्या 1 लाख इतकी आहे.
इतकच नव्हे तर, मध्य मुंबईमधील कुर्ला कारशेडमध्ये दाखल करण्यात आलेली नवी एसी लोकल ट्रेन जानेवारी 2020 मध्ये मुंबईकरांच्या सेवेसाठी रूजू होणार आहे. ही ट्रेन मध्य मार्गावरील मेन लाईनवर धावणार की ट्रान्स हार्बर लाईनवर धावणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही, मात्र लवकरच ही बाब देखील स्पष्ट होईल.