हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस बरसला आहे. तर पुढील 24 तासांत देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीत 250 मिमीहून अधिक पाऊस बरसला आहे. तर सिंधुदुर्गात 216 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापुढील 24 तासांत देखील अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (हेही वाचा - Mumbai Local Update: मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत)
कोकणाला धुवाधार पावसाने झोडपले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास समुद्र खवळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी मच्छीमारांना समुद्रात जाण्याची बंदी असून नागरिकांना देखील सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये देखील रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. तसेच पुढील काही तासांसाठी या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असणार आहेत.
मुंबईतील पावसाचा लोकलवरदेखील (Mumbai Local) परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेही उशिराने धावत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. यामुळे एकीकडे मुंबईकरांनी सोशल मिडियावर नाराजी व्यक्त केली आहे. तर आता विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असून अंबादास दानवे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.