Shivajirao Bhosale Sahakari Bank: पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द
RBI | (File Image)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय (RBI) ने पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द ((Pune Shivajirao Bhosale Sahakari Bank License Cancelled ) केला आहे. हा परवाना रद्द करण्यासोबतच ही बँक लिक्विडेशनमध्ये काढण्यात आल्याचेही आरबीआयने जाहीर केले आहे. पैसे थकवल्याच्या कारणावरुन शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे. सहकार विभागाने केलेल्या शिफारशीवरुन ही कारवाई करण्यात आली.

शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना रद्द करताना दिलेल्या कारणांमध्ये आरबीआयने काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. यात म्हटले आहे की, पुरेशा भांडवलाचा अभाव, उत्पन्नाचा स्त्रोत नसणे आदी कारणांमुळे पुणे येथील शिवाजीराव भोसले बँके आवश्यक निकषांची पूर्तता करत नाही. याशिवाय बँकेकडे ठेविदारांची रक्कम पूर्णपणे परत करण्यासारखी स्थितीही नाही. त्यामुळे ठेविदारांचे हित लक्षात घेता बँकेला आपला व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी देता येऊ शकणार नाही. याशिवाय बँकेच्या कामकाजात आर्थिक अनियमितताही आढलून आली आहे. त्यामुळे या बँकेचा परवाना रद्द केला आहे, असे  आरबीआयने म्हटले आहे. (हेही वाचा, Vasantdada Nagari Sahakari Bank Osmanabad: उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द; आरबीआयचा निर्णय)

आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार पुणे येथील शिवाजीराव भोसले बँक लिक्विडेशनमध्ये काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, विमा महामंडळाच्या कक्षेत असलेल्या बँकेच्या 98% ठेविदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. मात्र त्यासाठी ठेविदारांना आपले ओळखपत्र, केवायसी कागदपत्र घेऊन दावा सादर करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.