
कॉंग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आता पुन्हा शिंदेच्या नेतृत्त्वाखाली हातात धनुष्यबाण घेत शिवसेना (Shiv Sena) पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. मागील काही दिवसांपासून धंगेकर यांच्या शिवसेनेमधील घरवापसी ची चर्चा सुरू होती पण अखेर आज या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. रविंद्र धंगेकर यांनी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आज त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे. दरम्यान मीडीयाशी बोलताना धंगेकरांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देताना मनाला यातना होत आहेत पण सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत ही जनतेची भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रविंद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. 2002 ते 2022 ते धंगेकर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 2002 ला ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवक झाले. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर धंगेकरांनी मनसे मध्ये पक्षप्रवेश केला. 2007, 2012 ला ते मनसे कडून नगरसेवक झाले. 2009, 2014 ला त्यांनी मनसे कडून विधानसभा लढवत गिरीश बापटांना टक्कर दिली होती पण ते निवडून येऊ शकले नाहीत.
2017 मध्ये रविंद्र धंगेकर यांनी राज ठाकरेंदेखील सोडचिठ्ठी देत कॉंग्रेस कडून नगरसेवक झाले. देवेंद्र फडणवीस यांचे अंत्यत विश्वासू गणेश बिडकर यांचा पराभव त्यांनी केला होता.
'Who Is Dhangekar' ने पुन्हा चर्चेत
2023 साली मुक्ता टिळक यांच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत विजय मिळवत रविंद्र धंगेकर पुन्हा चर्चेमध्ये आले. यावेळी प्रचारात 'Who Is Dhangekar' असा सवाल विचारत चंद्रकांत पाटीलांनी खिल्ली उडवली होती पण भाजपाला कसब्यात पराभवाला सामोरे नेत रविंद्र धंगेकर यांनी 'Who Is Dhangekar' या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. Kasba Peth Assembly By-Election: महाविकास आघाडीच्या Ravindra Dhangekar यांनी मारलं कसब्याचं मैदान; 11040 मतांच्या फरकाने विजय.
2024 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्याकडून रविंद्र धंगेकर यांचा पराभव झाला. पुन्हा विधानसभेत भाजपाच्या हेमंत रासने यांनी रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला.
आता रविंद्र धंगेकर पुन्हा शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत. हा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाचा एक बळी आहे. शिवसेनेने त्यांना काही देऊ केलं असेल, त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे