Ratnagiri: MPSC परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने आले नैराश्य; रत्नागिरी येथे 26 वर्षीय तरूणाची आत्महत्या
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करत असलेल्या 26 वर्षीय तरूणाने रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील आपल्या घरात आत्महत्या (Suicide) केली आहे. लांजा पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, गुरुवारी दुपारी लांजा तालुक्यातील कोर्ले – सहकारवाडी येथे महेश लक्ष्मण झोरे (Mahesh Laxman Jhore) याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, महेश त्यावेळी घरात एकटाच होता. त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मामांनी त्याचा मृतदेह पहिला व पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळावरून एक सुसाइड नोटही सापडली आहे.

एमपीएससी परीक्षेच्या तारखा वेळोवेळी पुढे ढकलल्या जात असल्याच्या नैराश्यातून महेशने आत्महत्या केली आहे. गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. मृत महेशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत होता आणि परीक्षा सतत पुढे ढकलल्यामुळे नाराज झाला होता. या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

महेश आपल्या कुटुंबासह मुंबईमध्ये राहतो. मात्र सध्या एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी तो गावी एकटाच राहत होता. शेजारी त्याचे मामा त्याची देखभाल करत होते. त्याचा अभ्यास पूर्ण झाला होता मात्र परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने त्याला नैराश्य आले होते. गुरुवारी तो घरात एकटाच असता पडवीच्या वाशाला साडीचा गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळा झाला तरी भाचा घरातून बाहेर आला नसल्याने मामांनी महेशच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना महेशचा मृतदेह दिसला.

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रिलिम्ससह सर्व भरती परीक्षा ऑगस्टच्या शेवटी महाराष्ट्र सरकारकडून स्थगित केल्या आहेत. कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रिलिम्सची परीक्षा तीन वेळा स्थगित झाली आहे. यापूर्वी ही परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार होती. लॉकडाऊनमुळे ते 13 सप्टेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. 13 सप्टेंबर वैद्यकीय यूजी प्रवेश परीक्षा नीटची तारीख होती. त्यामुळे ही प्रिलिम्स पुन्हा 20 सप्टेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा तिसऱ्यांदा स्थगित झाली.