कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात आज रिफायनरी सर्वेक्षणातील दुसरा दिवस आहे. या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे रत्नागिरी येथील बारसू ( Barsu Refinery Project) गावात नागरिकांचे आंदोलन (Ratnagiri Barsu Refinery Protest) सुरु आहे. दरम्यान, हे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, पोलिसांनी रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या सुमारे 25 महिला आंदोलकांना ताब्यात घेल्याचे वृत्त आहे. एका बाजूला आंदोलन सुरु असतानाच राज्याचे विरोधी पक्षनते अजित पवार (Ajit Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
रिफायनरी आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीसफाटा तैनात केला आहे. तसेच, आंदोलन परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. बारसू हे गाव छोटं असले तरी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात असल्याने वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आतापर्यंत आंदोलन स्थाळावरुन 25 महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. (हेही वाचा, Konkan Refinery: कोकणातील रिफायनरी बारसू सोलगावात होणार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडून हिरवा कंदिल)
रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. प्रामुख्याने या आंदोलनात महिला आघाडीवर आहेत. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर रिफायनरीचा विरोध होतो आहे. दुसऱ्या बाजूला वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनाही अटकाव केला जात असल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी प्रसारमाध्यमांना बळाचा वापर करत पोलीस बाजूला करत असल्याचेही बोलले जात आहे.
ट्विट
सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 25, 2023
अजित पवार यांचा इशारा
दरम्यान, अजित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, ''रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं.''
ट्विट
Sanjay Raut | बारसूत जालियनवाला हत्याकांड होईल; संजय राऊत यांच्याकडून भीती व्यक्त
.
.#sanjayraut #barsu #marathinews pic.twitter.com/wolene3pQN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 25, 2023
जालियनवाला बाग हत्याकांड होईल- संजय राऊत
संजय राऊत यांनीही राज्य सरकारने बारसू आंदोलकांप्रती घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. राज्य सरकार आंदलकांवर इतकी दडपशाही का करत आहे? पोलिसांना वेळीच रोखले नाही आणि राज्य सरकारने विचाराने पावले टाकली नाही तर आंदोलकांवर गोळ्या झाडल्या जाण्याची शक्यता आहे. असे घडले तर या घटनेची नोंद इतिहासात जालीयनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे केली जाईल, अशी भीती आपल्याला वाटत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.