मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह सरकार मधील 18 मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे पाणीबिल थकीत असल्याने काल मुंबई महापालिकेद्वारे (BMC) त्यांची डिफॉल्टर यादीत (Defaulter List) नोंद घेण्यात आली होती, यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेत पाणी बिलाच्या रक्कमेत तफावत असल्याचे कारण असल्याने बिल भरण्यात दिरंगाई होत असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. या प्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळात फडणवीसांना थेट प्रश्न देखील केला होता यावर त्यांनी बांधकाम विभागाच्या उत्तराला अनुमोदन दर्शवलं. मात्र आज,राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई विभागातील युवा कार्यकर्त्यांनी या पाणी बिलाच्या संदर्भात भीक मागो आंदोलन पुकारल्याचे समजत आहे.
सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहीत हे आंदोलन केले.भीक मागो आंदोलन करून हेतू हा मुख्यमंत्र्यांची पाणीबिलाची रक्कम भरण्यासाठी भीक मागत असल्याचे लोकांना सांगितले. अनेकांनी या युवकांना खरोखरचं पैसे दिल्याचे सुद्धा यावेळी त्यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. 'वर्षा' सह सरकारी बंगल्यांच्या थकीत पाणी बिलावर बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण; बीलामध्ये तफावत असल्याचा खुलासा
दरम्यान,काल माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती.ज्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं 7 लाख 44 हजार 981 रुपये तर इतर नेत्यांच्या पाणी बिलाची रक्कम एकत्र केल्यास 8 कोटी रुपयांची थकबाकी आहे.