एका स्थानिक न्यायालयाने एका व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेक वर्षे बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. साधारणपणे. 29 सप्टेंबर रोजी बाल लैंगिक गुन्ह्यांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जयश्री आर पुलाटे यांचा हा सविस्तर आदेश बुधवारी उपलब्ध झाला आहे. फिर्यादीनुसार, आरोपी पिता सौदी अरेबियात एका जहाजावर काम करत आहे.
तो दर दोन महिन्यांनी मुंबईत आपल्या कुटुंबाला भेटायला यायचा. 2014 मध्ये त्याच्या पत्नीला समजले की, जेव्हाही तिचा नवरा घरी येतो तेव्हा तिची मुलगी त्याला टाळत आहे, त्याच्यापासून लपून ती आपल्या खोलीतच राहत आहे. आईने याबाबत खोदून विचारले असता, मुलीने आईला सांगितले की, तिच्या वडिलांनी गेल्या सात वर्षांत तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासून या दुःस्वप्नाचा सामना करत असल्याचे मुलीने सांगितले.
ही गोष्ट ऐकल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर तिने ताबडतोब पोलिसात धाव घेऊन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने नोंदवले की, जेव्हा या अत्याचाराला सुरुवात झाली तेव्हा मुलगी खूपच लहान होती आणि सुरुवातीला तिला काय होत आहे हे तिला समजत नव्हते. जेव्हा ती नववीच्या वर्गात गेली तेव्हा लैंगिक शिक्षणाच्या वर्गावेळी तिला समजले की तिच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. मात्र तरीही वडिलांच्या तुरुंगात जाण्याच्या भीतीने तिने घरी ही गोष्ट सांगितली नाही. (हेही वाचा: Kerala: अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार; न्यायालयाने सुनावली 142 वर्षांची शिक्षा, पाच लाखांचा दंडही ठोठावला)
यावर युक्तिवाद करताना आरोपीने सांगितले की, मुलीची शालेय शिक्षणातील प्रगती पाहता तिच्यावर असे अत्याचार होत असल्याचे दिसत नाहीत. मुलीला नववीच्या वर्गात सरासरी 70 टक्के गुण मिळाले आहेत आणि ती नियमितपणे शाळेत जात आहे. त्यामुळे तिच्या आरोपातील तथ्ये ही लैंगिक शोषणाच्या आरोपांशी जुळत नाहीत. परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत, लैंगिक अत्याचाराच्या प्रत्येक पीडिताची समान प्रतिक्रिया असू शकत नाही, असे म्हटले.