युनेस्को (UNESCO) सह आयोजित, वार्की फाऊंडेशन ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 (Varkey Foundation Global Teacher Prize 2020) साठी, लंडनमध्ये (London) गुरुवारी जगातील Top 50 शिक्षकांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली. यामध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शिक्षकाचे नाव समाविष्ट झाले आहे. तसेच भारतातील इतर दोन शिक्षकांनीही या यादीमध्ये स्थान मिळवले आहे. अशाप्रकारे जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांमध्ये भारतातील 3 शिक्षकांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रासाठी व देशासाठी ही खचितच आनंदाची बाब आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) असे या शिक्षकांचे नाव आहे.
रणजितसिंह डिसाले हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील, परितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. इतर शिक्षकांमध्ये राजस्थानमधील शिक्षा निकेतन बेअरफूट कॉलेजमधील शिक्षक शुवजित पेणे व दिल्लीतील एसआरडीएव्ही पब्लिक स्कूलमधील संगणक विज्ञान शिक्षक विनीता गर्ग यांचा समावेश आहे. 140 देशांमधून आलेल्या 12,000 अर्जातून या शिक्षकांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या 50 शिक्षकांच्या यादीमधून अंतिम 10 शिक्षक निवडले जातील. जून 2020 मध्ये ही अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. अखेर 12 ऑक्टोबर रोजी लंडनमधील नॅचरल हिस्ट्री संग्रहालयात होणाऱ्या एका कार्यक्रमात, अंतिम विजेता घोषित केला जाईल. 10 लाख अमेरिकन डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ग्लोबल टीचर पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. हा पुरस्कार अशा शिक्षकांना दिला जातो, ज्यांनी आपल्या क्षेत्रात काही उल्लेखनीय कार्य केले आहे, तसेच एक शिक्षक म्हणून समाजामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत असणारे, डिसले गुरुजी तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. 'क्युआर कोड' आणि 'व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप'च्या स्मार्ट उपक्रमातून त्यांनी शिक्षण पद्धतीला डिजिटल रूप दिले. आज त्यांच्या अनेक अभिनव संकल्पनांमुळे 150 पेक्षा अधिक देशातील मुलांचे ते अध्यापन करत आहेत.