Ramesh Bais | Twitter

रमेश बैस (Ramesh Bais) महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आज (18 फेब्रुवारी) शपथबद्ध  झाले आहेत. दरबार हॉल मध्ये त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश  संजय गंगापूरवाला  यांनी शपथ दिली आहे. महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून ते आता पाहणार आहे. रमेश बैस यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली आहे. दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कारभार रमेश बैस यांच्याकडे आला आहे. कोश्यारी यांची काही वादग्रस्त विधानं यावरून विरोधक आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून सातत्याने कोश्यारींवर टीकेचे बाण सोडत त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी होत होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कोश्यारींनीच आपल्याला पदमुक्त करावं अशा मागणीचं पत्र दिल्याचं समोर आलं होतं.

रमेश बैस हे माजी भाजपा खासदार आहे. 75 वर्षीय बैस हे यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. आज महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. काल त्यांनी शिव शंकर मंदिरात पूजा अर्चना केली आहे. यावेळी त्यांनी झारखंड प्रमाणे महाराष्ट्रातही आपल्या हातातून चांगलं काम व्हावं अशी आशा व्यक्त केली आहे. मुंबईत राजभवनामध्ये काल त्यांचं मराठमोळ्या अंदाजात स्वागतही झालं.

रमेश बैस हे मूळचे रायपूरचे आहेत. 1989 मध्ये रायपूरमधून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. तेव्हापासून एकूण 7 वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. 1998 मध्ये त्यांची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पोलाद आणि खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते 1999 ते 2004 या काळात रसायन आणि खते राज्यमंत्री आणि त्यानंतर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री होते.

संसदीय राजकारण, समाजकारण आणि संघटनात्मक कार्याचा 5 दशकांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री आणि राज्यपाल पदापर्यंत सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.