Ramdas Athawale: महाराष्ट्रात शून्य आमदार तरीही रामदास आठवले यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'पाच राज्यात रिपाइं लढवणार विधानसभा निवडणूक'
Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2021) त्यांचा पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट (RPI(A)) हा पक्ष आपले उमेदवार उतरवणार आहे. रामदास आठवले यांनी ही घोषणा करतानाच लवकरच आपण भारतीय जनता पक्ष (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहितीही दिली. विशेष म्हणजे इतकी मोठी घोषणा करणाऱ्या रामदास आठवले यांचा महाराष्ट्रात एकही आमदार नाही.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी अशा एकूण पाच राज्यांमध्ये यंदा (2021) विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच सुरुवात केली आहे. दरम्यान, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही आता या निवडणुकांसाठी इच्छुक असल्याचे दिसते.

रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत आरपीआय शक्य त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देईल. तसेच, निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये आरपीआयला भाजपने प्रत्येकी चार जागा द्याव्यात अशी मागणी असल्याचेही आठवले म्हणाले. (हेही वाचा, Reservation: मराठासह जाट, राजपूत आणि ठाकूर समाजालाही 10% आरक्षण देण्यात यावे- रामदास आठवले)

दरम्यान, भाजप आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवत रामदास आठवले म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री आणि तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. परंतू, या चर्चेमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत बोलणे झाले नाही. दोन्ही पक्ष एकत्र लढले परंतू शिवसेना आता राष्ट्रवादीच्या बिळात गेली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलकांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.